Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!
गुन्हे न्यूज राजकारण

Ambernath: अंबरनाथमध्ये भाजप – मनसे कार्यकर्ते भिडले, मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना अटक!

Aug 13, 2026

अंबरनाथ १३ : अंबरनाथमध्ये खाजगी जागेच्या वादातून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. अंबरनाथच्या शिवाजीनगर परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकारी संतोष शिंदे यांना मारहाण केली. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले असता तिथं असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिकेंच्या गाडीची तोडफोड केली. विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या आवारातच ही घटना घडल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

भाजपच्या कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह ९ जणांच्या विरोधात दरोडा, विनयभंग, मारहाण, धमकी, दंगल आणि ऍक्टरोसिटी यांसारख्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केलीय. शैलेश शिर्के यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अंबरनाथमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

पोलीस ठाण्याच्या आवारातच मनसे पदाधिकाऱ्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती यावर अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला.खाजगी जागेच्या वादातून भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या दहा जणांवर गुन्हे दाखल केलेत मात्र शिवाजीनगर पोलिसांच्या समोरच मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यावर हल्ला करून गाडीची तोडफोड करणाऱ्या भाजपच्या एकही कार्यकर्त्यावर पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही त्यामुळं पोलीस भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *