Thane: रायलादेवी परिसरात राबविण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ठाणे न्यूज

Thane: रायलादेवी परिसरात राबविण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Aug 13, 2026

ठाणे (13) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या उपक्रमांतंर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाली आज प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आली. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संख्ये यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेवून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले-जाधव, राजेंद्र फाटक उपस्थितीत होते. या मोहिमेत रायलादेवी तलाव परिसरातील कचरा उचलून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.

तसेच या ठिकाणच्या झाडांच्या फांद्याचे ट्रीमींग करण्यात आले तसेच येथील पालापाचोळा उचलण्यात आल्या. या ठिकाणच्या फरशांची घासून स्वच्छता करण्यात आली. तलावाच्या बाहेरील परिसरातील अनावश्यक साहित्य हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता मोहिमेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभागातील 75 कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच 2 शौचालय सफाई जेटिंग गाड्या, 2 आर्यन जेटिंग गाड्या, घंटागाडी, C&D कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या, 1 जेसीबी आणि 1 डंपर यांचा वापर करण्यात आला. उपलब्ध मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीच्या मदतीने तलाव परिसरातील कचरा, गाळ, माती आणि इतर जमा झालेले साहित्य मोठ्या प्रमाणावर हटविण्यात आले. ही मोहीम केवळ स्वच्छता विभागापुरती मर्यादित न ठेवता बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, गार्डन विभाग आणि ड्रेनेज विभाग यांच्या समन्वयाने राबविण्यात आली.

त्यामुळे परिसरातील स्वच्छतेसोबतच आवश्यक त्या ठिकाणी अडथळे दूर करणे, ड्रेनेज व्यवस्था सुस्थितीत आणणे आणि परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीनेही काम करण्यात आले. या मोहिमेस उपायुक्त मधुकर बोडके, वैभव आवारे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहायक आयुक्त महेश जामनोर, उपअभियंता समीर अंबराळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक शयुराज कांबळे, मयुरी वखारिया, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, राजेश वळवी, प्रवीण बनोटे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सफाई कर्मचारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *