Thane: शाळेच्या बाकावर ड्रग्ज; ठाण्यात ‘उडता पंजाब’ची भीती?
ठाणे १७ : ठाण्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा अमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक विद्यार्थी हातात पांढरा पदार्थ घेऊन बसला असून दुसरा मुलगा नाकाने त्याचे सेवन करताना दिसत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शाळेच्या बाकावरच ड्रग्ज पोहोचल्याचे समोर आले असून “ठाण्याचा ‘उडता पंजाब’ होतोय का?” असा सवाल आता प्रत्येक पालकाला छळत आहे. विद्या मंदिर असलेल्या शाळेतच मुले अमली पदार्थ सेवन करत असतील, तर याला निष्काळजीपणा म्हणायचा की संपूर्ण व्यवस्थेचे अपयश, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकरणात ड्रग्जच्या पुरवठ्याचे जाळे नेमके किती मोठे आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आणि ठाणे पालिकेच्या नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पानटपऱ्यांमधून चॉकलेटी नावाच्या ड्रग्जची विक्री होत असल्याचा मुद्दा महासभेत मांडला होता.
त्यानंतर पालिकेने शाळा आणि रुग्णालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू व गुटखा बंदी घातली; तरीही मुलांपर्यंत अमली पदार्थ पोहोचतच आहेत.ही काही एकमेव घटना नाही. काही दिवसांपूर्वीच डायघरमध्ये रिक्षातून तीन कोटींची एमडी पावडर घेऊन जाणारा आरोपी पकडला गेला होता. ठाणे आयुक्तालयात गेल्या दोन वर्षांत ड्रग्जचे १०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले असून तब्बल ३९ कोटींचा ५९४ किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंब्रा, कल्याण फाटा, वागळे इस्टेट, कळवा आणि डायघर ही नावे आता थेट ड्रग्ज तस्करांशी जोडली जात आहेत.नोकरी करणारे दोन्ही पालक मुलांना पुरेशी वेळ देऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती असली, तरी मुलांच्या दैनंदिन आयुष्यात काय चालले आहे याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. ‘माझे मूल नाही’ म्हणून समाजानेही डोळेझाक करून चालणार नाही.
केवळ माल जप्त करणे आणि आरोपींना अटक करणे पुरेसे नसून या तस्करीची पाळेमुळे खणून काढावी लागतील. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रभावी समुपदेशन, पालक-शिक्षक मेळावे आणि पोलिसांकडून नियमित तपासणी मोहीम राबवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.ठाणे ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी आहे. अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त झाली, तर त्याचे परिणाम फक्त एका कुटुंबापुरते मर्यादित राहत नाहीत. शाळा-महाविद्यालयातील मुलांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजतेने पोहोचत असतील, तर महापालिकेसह सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
पोलिस आणि प्रशासनाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनी कोट्यवधींचा माल नष्ट केला असला, तरी प्रत्यक्षात पुरवठा थांबलेला नाही. वर्गात मोबाईल कसा आला? प्रवेशद्वारावर तपासणी झाली का? शिक्षकांना काहीच कसे दिसले नाही? पोलिस आणि एफडीए काय करत आहेत? शाळा परिसरातील टपऱ्या आणि पेड्लर्सवर सातत्याने कारवाई का होत नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. पोलिस, राजकारणी, शिक्षक आणि पालक या चौघांनीही एकत्र येऊन काम केले नाही, तर ठाण्याचा ‘उडता पंजाब’ व्हायला वेळ लागणार नाही!
