Ganpati festival:गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकांचा उत्साह; परळ, लालबाग परिसरातील वाहतुकीत बदल!
ताज्या बातम्या न्यूज मुंबई

Ganpati festival:गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकांचा उत्साह; परळ, लालबाग परिसरातील वाहतुकीत बदल!

Aug 17, 2026

मुंबई १७ : मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू झाली आहे. परळ, लालबाग आणि करी रोड येथील कारखान्यांमधून गणरायाच्या भव्य मूर्ती मोठ्या वाहनांमधून मंडपांकडे रवाना होत आहेत. या आगमन मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणी विविध वेषभूषा करून मोठा उत्साह दाखवत आहेत, तर रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि उंचीच्या मूर्ती पाहण्यासाठी व क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्सचीही मोठी गर्दी दिसून येत आहे.या मिरवणुका मुळे परळ, लालबाग, चिंचपोकळी आणि करी रोड परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक शिवडी, राणीबाग आणि भायखळा मार्गे वळवली आहे. तरीही काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, संभाव्य गर्दी लक्षात घेता मंडळांकडून शिस्तीचे आवाहन केले जात आहे.परळचा सम्राट, मुंबईचा महाराजा, अखिल चंदनवाडी, काळाचौकीचा महाराजा, विक्रोळीचा एकदंत यांसारख्या प्रसिद्ध मूर्तींचे आगमन सुरू झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी खेतवाडीचा विघ्नहर्ता, धारावीचा सुखकर्ता, मालाडचा राजा, मरोळचा विघ्नहर्ता, शिवडीचा राजा, भुलेश्वरचा विघ्नहर्ता आणि परळचा मोरया यांच्या मूर्ती मंडपात नेण्यात आल्या, तर १६ ऑगस्ट रोजी काळाचौकीचा महागणपती, फोर्टचा राजा, खेतवाडीचा राजा, मुंबईचा सम्राट, भांडुपचा युवराज, धारावीचा वरदविनायक, चेंबूरचा समर्थ आणि मालाडचा मोरया या मूर्ती कारखान्यातून मार्गस्थ झाल्या.

येत्या काही दिवसांतही गणेश मंडळांच्या आगमन मिरवणुका सुरूच राहणार असून, गणराया मंडपात विराजमान झाल्यानंतर आता मंडपांची सजावट, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि देखाव्यांचे अंतिम काम वेगाने पूर्ण केले जात आहे. अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यावर यंदा विशेष भर दिला आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *