Thane : कॅमेऱ्यातून उलगडलेल्या ठाण्याची अधिकाऱ्यांनी घेतली अनुभूती; ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
ठाणे ताज्या बातम्या

Thane : कॅमेऱ्यातून उलगडलेल्या ठाण्याची अधिकाऱ्यांनी घेतली अनुभूती; ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Aug 19, 2026

ठाणे, दि. १८ जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भव्य छायाचित्र प्रदर्शनाला मंगळवारी महापालिका अधिकारी आणि प्रशासनातील मान्यवरांनी भेट देत ठाणे शहराच्या विविध पैलूंची अनुभूती घेतली.


१७ ते १९ ऑगस्ट दरम्यान आयोजित या प्रदर्शनात ठाणे शहरातील निसर्ग, संस्कृती, सामाजिक जीवन, विकासकामे, ऐतिहासिक वारसा तसेच शहराचे बदलते रूप टिपणारी विविध छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. दिवसभराच्या कार्यालयीन कामकाजानंतर अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देत छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या ठाण्याचे वेगळे आणि देखणे रूप अनुभवले.


मंगळवारी सायंकाळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्यालय उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त दीपक झिंजाड, क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे, उपायुक्त वैभव आवारे, प्र. जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, वृक्षप्राधिकरण विभागाचे लक्ष्मण पुरी, तसेच निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली.


प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी करताना अधिकाऱ्यांनी छायाचित्रकारांशी संवाद साधला. शहराच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनापासून निसर्गरम्य ठाण्यापर्यंतचे विविध रंग छायाचित्रांतून प्रभावीपणे मांडण्यात आल्याचे पाहून उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष दीपक शेलार, खजिनदार राजेश शेटकर, सदस्य सचिन देशमाने, मनोज वाजपेयी, अशोक गुप्ता, सौरव डाके, सुरेश साळवे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.


कार्यालयीन कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकाऱ्यांनी छायाचित्र प्रदर्शनात रममाण होत ठाण्याच्या आठवणी आणि सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे महापालिका मुख्यालयातील हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे न राहता, ठाणे शहराची विविध रूपे अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास ठरला आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *