Thane: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडानिषेधार्थ ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने-प्रबोधन मोहीम!
ठाणे २१ : अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कारवाद आणि अवैज्ञानिक विचारांविरोधात आयुष्यभर संघर्ष उभारणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या हत्येला १३ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर यांच्या वतीने डॉ. दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी निषेध निदर्शने, प्रबोधन भाषणे व स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती कार्याध्यक्ष अनिल ठाणेकर, प्रधान सचिव अशोक मोहिते व प्रधान सचिव किशोर भोईर यांनी दिली.
‘शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिना’निमित्त, ‘महा अंनिस-ठाणे शहर’ आयोजित ‘निषेध निदर्शने-प्रबोधन मोहीम व प्रचार पत्रक वाटप कार्यक्रमा’त अनिल ठाणेकर, किशोर भोईर, छाया ठाणेकर, संगिता जांभळीकर, दर्शना ढोले, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, पत्रकार रत्नपाल जाधव, के पी पाटील, नितीन ढोले, सलमान पठाण, चिंतामण साळवे, तेजस जाधव, प्राचार्य जयकुमार घोडके, नंदकिशोर तळाशीलकर, संदीप गोवळकर, प्रियांका सवाखंडे, निलिमा जाधव साथी सहभागी झाले होते. यावेळीअभिवादन गीत, आम्ही प्रकाश बीजे, शुर आम्ही सरदार अंनिसचे, आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान…आदी गीते गाण्यात आली.
तसेच शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर अमर रहे, विवेकाचा विचार अमर रहे, शिवफुलेशाहूआंबेडकर…आम्ही सारे दाभोलकर आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या. महा अंनिसची प्रचार पत्रकांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत ठाणे रेल्वे स्थानक (प.) येथे करण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळच्या फेरफटक्यादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या वेळी ते अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजातील शोषणकारी प्रथांविरोधात दीर्घकाळ जनजागृतीचे काम करीत होते.त्यांच्या हत्येने महाराष्ट्राच्या पुरोगामी, विवेकवादी आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मोठा धक्का बसला. मात्र, त्यांच्या विचारांचा प्रवाह थांबला नाही. उलट, त्यांच्या हत्येनंतर वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि अंधश्रद्धाविरोधी प्रबोधनाची गरज अधिक तीव्रतेने अधोरेखित झाली.
यामुळेच “माणूस मरतो, पण विचार मरत नाहीत” हा संदेश केवळ भावनिक श्रद्धांजली न राहता समाजजीवनातील विवेक, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि पुराव्यावर आधारित विचारपद्धती बळकट करण्याचे आव्हान आहे.शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्यानंतर कॉ गोविंद पानसरे, डॉ कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश, यांची हत्या झाली पण अद्यापही सूत्रधार मिळालेले नाही. खटल्याचा तपास पुणे पोलीस, सीआयडी, एसआयटी, एटीएस ,आणि देशातील सर्वोच्च यंत्रणा सीबीआय, हायकोर्टाच्या मार्गदर्शनाखाली करत होती परंतु त्यांनी पुरेसे पुरावे न दिल्यामुळे जे संशयित ५ आरोपी होते. त्यातील डॉ वीरेंद्र सिंग तावडे, अँड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे सह आरोपी पुरेशा पुराव्या अभावी मे २०२४ सुटका करण्यात आली. शरद कळसकर व सचिन अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या म्हणून त्यांच्यावर जन्मठेप आणि पाच लाख रुपये दंड ही शिक्षा कोर्टाने दिली होती. त्या विरोधात ते अपिलात गेले आणि शरद कळसकरला पहिल्यांदा जामीन मिळाला आणि त्यानंतर सचिन अंदुरे याला तीन दिवसापूर्वी जामीन मिळालेला आहे!
