Thane: नवीन ठाणे रेल्वे स्थानक: बांदल चाळीतील ५० कुटुंबांचे आधी पुनर्वसन, मगच कारवाई!
ठाणे २१ : ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी नवीन ठाणे रेल्वे स्थान उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या मार्गात गेल्या ६० वर्षांपासून असलेल्या बांदल चाळीतील ५० कुटुंबांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वे प्रशासनाकडून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्याने नागरिक हवालदिल झाले होते.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली.
बांदल चाळीतील नागरिकांचे प्रथम योग्य पद्धतीने पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच निष्कासनाची कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आमदार केळकर यांनी मांडली.रेल्वे व्यवस्थापक मीना यांनी ही मागणी मान्य करत, पुनर्वसन झाल्याशिवाय चाळ हटवली जाणार नाही अशी ग्वाही दिली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, नवीन स्थानक प्रकल्पातील मुख्य अडथळा दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!
