चांदगुडे कुटुंब आत्महत्या प्रकरण: इन्स्टाग्राम पोस्ट आणि मृत्यूनंतर नातेवाईकांमधील वाद!
छत्रपती संभाजी नगर २५ : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. १८ वर्षांचा कुणाल चांदगुडे हा तरुण शुक्रवारी सकाळी टोकाचे पाऊल उचलण्याच्या इराद्याने खवड्या डोंगरावर गेला होता. तिथे कुटुंबीयांनी त्याची खूप मनधरणी केली, परंतु तो माघार घेण्यास तयार नव्हता. अखेरीस वडील त्याला मागे खेचण्यासाठी गेले असता कुणालने स्वतःला कड्यावरून खाली लोटून घेतले. या प्रयत्नात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर मुलगा आणि पतीपाठोपाठ आई संगीता यांनीही कड्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले.
इन्स्टाग्राम पोस्टचा धक्कादायक खुलासा:
या घटनेआधी कुणालने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहीली होती. त्याच्या एका दुकानदार मित्राने दिलेल्या माहितीनुसार, ही पोस्ट फक्त त्याच्या जवळील मित्र यादीत असलेल्या व्यक्तींनाच दिसत होती. त्यात त्याने ‘आय एम सॉरी एव्हरीवन’ असा सूचक संदेश लिहिला होता. मित्राने संध्याकाळी ही पोस्ट पाहिल्यावर हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.
घटनेनंतर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर:
एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनंतर चांदगुडे कुटुंबातील अंतर्गत वाद आता समोर येत आहेत. मृत मुरलीधर चांदगुडे यांच्या घरची मंडळी आणि संगीता चांदगुडे यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडून एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच मतभेदांमुळे आणि वादांमुळे कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई संगीता यांच्यावर आईच्या माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर कुणालचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांनी मूळ गावी अंत्यसंस्कार केले!
