Ladki bahin yojna: रक्षाबंधनाआधी खात्यात हप्ता जमा होणार; शासनाचा मोठा निर्णय!
लाडकी बहीण योजना २५ : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.निधी वर्ग झाल्यामुळे तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर झाल्या असून निधी हस्तांतरणाची प्रक्रिया आता युद्धपातळीवर सुरु आहे.
त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरवात होईल आणि मोबाईलवर मेसेज प्राप्त होतील. या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे १ कोटी ६५ लाख पात्र महिलांना जुलैचा हप्ता खात्रीशीरपणे मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे कागदपत्रांची अपूर्तता किंवा निकषांत न बसल्यामुळे जवळपास ९० लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे.दरम्यान, या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या तरतुदींवर अवलंबून राहावे लागत आहे.
यापूर्वीही फेब्रुवारी २०२६ मध्ये जानेवारीच्या हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपये, ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांसाठी प्रत्येकी ४१०.३० कोटी रुपये, तर जून २०२५ मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी ४१० कोटी रुपये या योजनेकडे वळवण्यात आले होते. वारंवार अशा प्रकारे निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या इतर मूळ कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर आणि अर्थसंकल्पीय बजेटवर थेट परिणाम जाणवू लागल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली आहे!
