Dombivli: डोंबिवलीत भाजप अन् मनसेत ‘डिजिटल युद्ध’…एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाना!
डोंबिवली २५ : डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना आता सोशल मीडियाची जोड मिळाली असून दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष थेट डिजिटल व्यासपीठावर पोहोचला आहे. शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवरून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून, सोशल मीडिया पोस्ट, मीम्स आणि एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या व्यंगचित्रांमधून प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.काही दिवसांपूर्वीपर्यंत विविध राजकीय मुद्द्यांवर एकमेकांवर थेट टीका करणाऱ्या भाजप आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जोरदार शाब्दिक सामना रंगताना दिसत आहे.
शहरातील खड्डेमय रस्ते, मैदानांचे प्रश्न, रखडलेली विकासकामे, प्रशासकीय अनास्था आणि स्थानिक राजकारणातील विविध मुद्द्यांवरून दोन्ही बाजूंनी एकमेकांना सवाल विचारले जात आहेत.या सोशल मीडिया वॉरमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजेच एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या व्यंगचित्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे व्यंगचित्रात्मक फोटो आणि विविध राजकीय संदर्भ असलेल्या पोस्ट तयार करून त्या व्हॉट्सॲप, फेसबुक आणि एक्सवर प्रसारित केल्या जात आहेत. या पोस्टच्या माध्यमातून एकमेकांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टोलेबाजी केली जात आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील या आरोप-प्रत्यारोपांना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पोस्टवर कमेंट्स, शेअर्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून दोन्ही बाजूंचे समर्थक आपापल्या पक्षाची बाजू मांडताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय संघर्षाचा धुरळा आता डिजिटल माध्यमांवरही उडताना दिसत आहे!
