Ambernath: फेसबुकवर मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; दोन भावांकडून महिलेचं लैंगिक शोषण!
फेसबुकच्या माध्यमातून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून दोन सख्ख्या भावांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आलाय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली असून त्याचा साथीदार मात्र फरार झालाय.
अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात राहणाऱ्या श्याम वायले यानं चार वर्षांपूर्वी पीडित महिलेशी फेसबुकवर मैत्री केली, त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून गुंगीचे औषध देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचे व्हिडिओ चित्रित करून प्रकरणाची वाच्यता केल्यास सदरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय.
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी श्याम वायले आणि अंकुश वायले या दोन भावांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. यापैकी एका आरोपीला पोलोसांनी अटक केली असून त्याला न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत तर दुसरा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही!
