ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा स्नेहबंध“भिंती कारागृहाच्या असल्या, तरी प्रेमाच्या नात्यांना कोणत्याही भिंती नसतात!
ठाणे २८ : मा.डॉ.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्रेरणेतुन व मा.श्री. योगेश देसाई,विशेष कारागृह महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला कारागृहातील जीवन हे शिस्त, नियम आणि बंधनांनी व्यापलेले असले, तरी मानवी भावभावना मात्र तितक्याच जिवंत असतात. भारतीय संस्कृतीतील सण हे या भावनांना व्यक्त होण्यासाठी एक सुंदर माध्यम ठरतात. विशेषतः रक्षाबंधनाच्या दिवशी कारागृहातील बंद्यांना आपल्या बहिणीची, तिच्या प्रेमाची आणि मायेची प्रकर्षाने आठवण येत असते. अशा वेळी रक्षाबंधनासारखा सण त्यांच्या मनावर मायेची फुंकर घालण्याचे, भावनिक आधार देण्याचे आणि समाजाशी असलेले नाते पुन्हा दृढ करण्याचे कार्य करतो.
याच भावनेतून ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे जीवन विद्या मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, ठाणे, सेवाधाम कम्युनिटी सर्विस असोसिएशन, ठाणे तसेच संस्कार सेवाभावी संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने बंद्यांसाठी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या प्रतिनिधींनी बंद्यांना राखी बांधून बंधुभाव, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. राखी बांधताना अनेक बंद्यांच्या चेहऱ्यावर भावूकता दिसून आली. काही क्षणांसाठी कारागृहातील कठोर वातावरणाला मायेची, आपुलकीची आणि भावनिक ऊब लाभली.
“राखीचा धागा हा केवळ मनगटावर बांधला जाणारा धागा नसून, तो विश्वास, प्रेम, जबाबदारी आणि नात्यांची आठवण करून देणारा भावबंध आहे. परिस्थितीमुळे व्यक्ती कारागृहाच्या भिंतीआड असली, तरी तिच्या भावना आणि नाती या भिंतींपलीकडे असतात.” या भावनेतून रक्षाबंधन कार्यक्रमाने बंद्यांच्या मनाला सकारात्मक स्पर्श केला. कारागृह प्रशासनाच्या वतीने अशा सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारे सण-उत्सव हे बंद्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, त्यांच्यातील माणुसकी जपणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी होण्याची प्रेरणा देणे या पुनर्वसनाच्या उद्देशाला निश्चितच बळकटी देतात.
रक्षाबंधन सनानिमित्य ठाणे मध्यवर्ती कारागृह विक्रिकेंद्रामार्फत विविध वस्तु खास रंगीबेरंगी राख्या,लाकडी व लोखंडी वस्तु, शोपिस, दऱ्या, आसनपट्टी, कपडे, टॉवेल इ. वस्तू विक्रिसाठी उपलब्ध आहेत. सदरचे विक्रि केंद्र हे सर्व नागरीकांसाठी सकाळी ८:३०.ते सायं ७:०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. आसे आवाहन करण्यात येत आहे.
