Manoj jarange: मागण्या चुकीच्या, गुन्हे मागे घेता येणार नाहीत… जरांगेंच्या उपोषणावर गुणरत्न सदावर्तेंची टीका!
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी १० वाजल्यापासून पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन चर्चा केली, परंतु त्यातून कोणताही मार्ग किंवा तोडगा निघू शकला नाही. यामुळे सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील ‘जात पडताळणी समिती’ तात्काळ रद्द करावी, ही सर्वात मोठी मागणी केली. देशात इतर कुठेही अशी व्यवस्था नसताना फक्त महाराष्ट्रातच जात पडताळणी समिती कशाला हवी, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या उपोषणात मराठा समाजाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.दुसऱ्या बाजूला, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनावर आणि मागण्यांवर जोरदार टीका केली आहे.
जरांगे यांच्या मागण्या चुकीच्या आणि अयोग्य असून त्या मान्य केल्या जाऊ शकत नाहीत, असे सदावर्ते यांनी म्हटले. आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असा दावा करत त्यांनी पुढे म्हटले की, रेतीच्या कंत्राटदारांकडून जरांगे यांना चुकीची माहिती दिली जात आहे, कारण अशा कंत्राटदारांना आरक्षणाची कायदेशीर चक्रे कळत नाहीत.सदावर्ते यांनी पुढे स्पष्ट केले की, आरक्षणाचे मूळ तत्व समजण्यासाठी केवळ अभ्यासक असून चालत नाही, तर त्यासाठी संशोधक आणि वकिलांची भूमिका महत्त्वाची असते, मात्र या प्रक्रियेत कोणाचेही ऐकून घेतले जात नाही.
आपण स्वतः संविधानवादी असल्याचे सांगत सदावर्ते यांनी स्पष्ट केले की, कुणबी म्हणून जवळपास ४० निरनिराळ्या जाती आहेत आणि केवळ ‘नोंदी-नोंदी’चा जप केल्याने कायदे किंवा कायदेशीर प्रक्रिया बदलत नाहीत. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील मराठा समाजाचा उल्लेख करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. सध्या सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा अपयशी ठरल्यामुळे जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत!
