Packaged Food : FSSAI चा मोठा निर्णय ; पॅक बंद फूड आणि ड्रिंक्सवर लावणार लाल षटकोनी चिन्ह; नेमकं काय कारण? वाचा…
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पॅकेज्ड फूड आणि ड्रिंक्सच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ज्या पॅकबंद पदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये साखर, मीठ किंवा फॅटचे प्रमाण जास्त असेल, त्यांच्या पॅकेजिंगवर लाल षटकोनी (Red Hexagon) इशारा देणारे चिन्ह छापणे बंधनकारक केले जाणार आहे. या नव्या नियमांनुसार, अशा खाद्यपदार्थांवर ‘HIGH SUGAR’, ‘HIGH SALT’ किंवा ‘HIGH FAT’ अशी स्पष्ट चेतावनी दिली जाईल. हे चेतावणी चिन्ह पॅकवरील नियमित पोषणमूल्यांच्या तक्त्यापेक्षा मोठ्या अक्षरात छापण्याचा प्रस्ताव आहे, जेणेकरून ते खरेदी करताना ग्राहकांच्या त्वरित लक्षात येईल.
FSSAI ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पत्राद्वारे या प्रस्तावाची माहिती दिली आहे. ‘3S And Our Health Society’ या संस्थेने खाद्यपदार्थांवर अशा प्रकारचे फ्रंट-ऑफ-पॅक चेतावणी लेबल अनिवार्य करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने FSSAI ला त्वरित आणि योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर FSSAI ने न्यायालयात आपले अनुपालन प्रतिज्ञापत्र (Affidavit) दाखल करून या नवीन नियमांची माहिती सादर केली आहे. कंपनीने या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे!
