Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!
ताज्या बातम्या

Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!

Aug 31, 2026

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे यांनी परभणीचा कार्यक्रम रद्द न केल्याने संतप्त झालेल्या जरांगे यांनी, आता थेट मुंबईला जाऊन या कृतीची परतफेड करण्याचा सज्जड इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती आपल्याला ऐनवेळी मिळाली आणि अंतरवाली ते परभणी हे १५५ किलोमीटरचे अंतर असून सीमा बंद असल्याने तिथे जाणे शक्य झाले नाही, अन्यथा तिथे मोठा सामना झाला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले.या दौऱ्यामागे मंत्री संजय शिरसाट यांची स्टंटबाजी असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

शिरसाट यांनी खासदार संजय जाधव यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मराठवाड्यात आणले असून, संजय जाधव हे आता चंद्रशेखर बावनकुळे आणि शिरसाट यांच्या टोळीत सामील झाल्याचे ते म्हणाले. जाधव यांनी मराठा समाजाला सांभाळून घेणे गरजेचे होते, मात्र त्यांच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली असल्याची टीकाही जरांगे यांनी केली. तसेच, मंत्री संजय शिरसाट यांनी मराठवाड्यातील चार कुणबी प्रमाणपत्रे मुद्दामहून रद्द केली असून, ती दुरुस्त होईपर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात दौरा करू नये, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्यांची राहील, असा थेट इशारा त्यांनी दिला.

परभणीच्या या संपूर्ण घडामोडीवर आमदार बच्चू कडू यांनी जरांगे यांना फोन करून संवाद साधला. परभणीचा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी कडू यांच्यामार्फत जरांगे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावर आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे म्हणाले की, आपण केवळ चर्चांवर विश्वास ठेवत नाही तर फक्त लढायला शिकलो आहोत. नुसत्या चर्चा करून मराठा समाजावरील अन्याय दूर होणार नाही, असे सांगत त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपसमितीवरील कार्यपद्धतीवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *