Ganpati festival : गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी; जाणून घ्या ४ प्रमुख दिवस आणि नियम!
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार सामान्यतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास निर्बंध असतात. मात्र, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्षातील काही ठरवून दिलेल्या दिवसांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची विशेष परवानगी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. मुंबई शहरासाठी वर्षाभरातील विविध सणांसाठी एकूण १५ दिवस निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी चार दिवस गणेशोत्सवासाठी देण्यात आले आहेत.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या अधिकारातील दिवसांची यादी जाहीर केली आहे. यानुसार गणेशोत्सवाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबर २०२६, पाचव्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर २०२६, गौरी विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर २०२६ आणि अनंत चतुर्दशी अर्थात मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी म्हणजेच २५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुका तसेच स्थानिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन रात्री उशिरापर्यंत करण्यास काहीसा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, हे चारही दिवस विसर्जनाचे कार्यक्रम असलेले असल्याने मंडळांना स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आणखी एक दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केली आहे. त्यामुळे या मागणीवर प्रशासनाकडून पुढे काय निर्णय होतो, याकडे आता गणेश मंडळांचे लक्ष लागले आहे!
