Supriya Sule : अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा, माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का नाही?’सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; ‘अजित पवार गेले, पण त्यांचे आमदार सत्तेची फळे चाखत आहेत – सुप्रिया सुळे!
ठाणे ताज्या बातम्या

Supriya Sule : अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा, माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का नाही?’सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; ‘अजित पवार गेले, पण त्यांचे आमदार सत्तेची फळे चाखत आहेत – सुप्रिया सुळे!

Sep 2, 2026

ठाणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला म्हणून अमित ठाकरेंवर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो; मग माझे भाऊ अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही?’ असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी राज्य सरकारला केला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या पक्षातील आमदार-खासदार सत्तेत सहभागी असून सत्तेची फळे चाखत आहेत; मात्र आपल्या नेत्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी करण्याचे धाडस त्यांच्यापैकी एकानेही केलेले नाही, असा घणाघात सुळे यांनी केला.ठाण्यातील पक्ष कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना सुळे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ‘माझा भाऊ गेला. त्यांच्या पक्षाचे लोक मात्र आजही सत्तेत आहेत.

माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआरची स्थिती काय आहे? तपास कुठे सुरू आहे? त्यात काय प्रगती झाली? आम्हाला काहीच माहिती नाही,’ असे त्या म्हणाल्या.‘एका बाजूला पंतप्रधानांचा फोटो काढला म्हणून दोन तासांत गुन्हा दाखल होतो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी अजूनही एफआयआर नाही. कायद्याची हीच समानता आहे का?’ असा सवाल करत त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.सत्तेत सहभागी, पण भावाच्या चौकशीवर मौन!अजित पवार हे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार आजही सत्तेत आहेत. मात्र अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीबाबत त्यांच्यापैकी एकही लोकप्रतिनिधी बोलत नसल्याचे सुळे यांनी सुनावले.

‘माझा भाऊ गेल्यानंतरही सत्ता सुरू आहे; पण त्यांच्या मृत्यूच्या चौकशीचा विषय कुठेच नाही. हा प्रश्न आम्ही विचारत राहणार,’ असा इशाराही त्यांनी दिला.‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता?’राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून सुळे यांनी सरकारची कोंडी केली. ‘महाराष्ट्रात प्रवास करताना रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे, हेच समजत नाही,’ अशी बोचरी टीका त्यांनी केली. ही अवस्था आता नवीन राहिलेली नसून नागरिकांनाही त्याची सवय झाल्याचा टोला त्यांनी लगावला.सामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प का लादले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला.

कोल्हापुरात शेतकरी एखादा प्रकल्प नको असल्याचे सांगत असतानाही तो लादला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.रिंग मेट्रोला विरोध; ‘महागडे प्रकल्प कशासाठी?’ठाणेकरांना रिंग मेट्रो नको असून चांगली बससेवा द्यावी, अशी नागरिकांची मागणी असल्याचे सुळे म्हणाल्या. ‘५०० रुपयांत होणारे काम एक लाख रुपयांना का करायचे? सरकारला महागडे प्रकल्प आवडतात; पण सामान्य माणसाच्या गरजेच्या छोट्या प्रकल्पांसाठी पैसा नाही,’ असा टोला त्यांनी लगावला.ठाण्यातील डेटा सेंटरलाही नागरिकांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्याशी याबाबत संवाद साधला असून त्यांनीही या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितल्याचा दावा सुळे यांनी केला. ‘लोकांना जे नको आहे, ते त्यांच्या माथी मारण्याऐवजी सरकारने त्यांचे म्हणणे ऐकावे,’ असे त्या म्हणाल्या.

महागाईचा भडका; ‘सामान्य माणसाने जगायचे कसे?’दूध शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. धान्य, दूध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या आहेत. नोकऱ्या जात आहेत आणि तरुण रोजगाराच्या शोधात फिरत आहेत. ‘सामान्य माणूस कर भरतो; मग त्याला स्वस्त काय मिळत आहे? सामान्य माणसाने जगायचे कसे?’ असा सवाल सुळे यांनी केला.आयुष्यभर कष्ट करून सामान्य माणूस सोने खरेदी करतो आणि अडचणीच्या काळात तेच सोने विकून घर चालवतो. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर सोने खरेदी करण्यास नागरिकांना विरोध का केला जातो, याचे उत्तर सरकारने द्यावे, असेही त्या म्हणाल्या.‘तारीख पे तारीख’वर संतापन्यायालयीन सुनावणीच्या विलंबावरही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.

‘आमची बाजू ऐकून घ्या, एवढीच मागणी आहे. मात्र आमच्या प्रकरणात तारीखच पडत नाही. तारीख पे तारीख हा खेळ आमच्या आयुष्यात कधी संपणार?’ असा सवाल त्यांनी केला.आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट करताना सुळे म्हणाल्या की, ‘माझ्यासोबत जो अन्याय झाला, तो भविष्यात कोणासोबतही होऊ नये. त्यामुळे मी या व्यवस्थेकडून न्याय मागत आहे.’एसआयआरवर ‘नजर’; मतदारांची नावे कमी झाल्याचा दावाएसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीतून कोणाची नावे कमी झाली आहेत, यावर पक्षाची बारकाईने नजर असल्याचे सुळे यांनी सांगितले. ‘आम्ही रोज तपासणी करत आहोत.

किती आणि कोणाची नावे कमी झाली आहेत, याचा आढावा घेत आहोत,’ असे त्यांनी स्पष्ट केले.मराठा, आदिवासी आणि ओबीसी समाजातील नागरिक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडत आहेत. ‘कोणता समाज रस्त्यावर उतरलेला नाही, ते सांगा. आपल्या समाजातील, आपल्या घरातीलच मुले रस्त्यावर उतरली आहेत. आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाने काय करायचे?’ असा सवाल करत सुळे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *