Ac local : एसी लोकलचा विस्तार, साध्या लोकलला कात्री! साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी; ‘एसीसोबत सामान्य लोकलही वाढवा’ची मागणी!
ठाणे – मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या सेवांचा विस्तार करण्याची तयारी सुरू असतानाच साध्या लोकलच्या फेऱ्यांबाबत प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एसी लोकलचा प्रवास काही प्रवाशांसाठी सोयीचा असला तरी सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा आणि मोठ्या संख्येने प्रवासी सामावून घेणारा पर्याय म्हणून साध्या लोकलच्या फेऱ्यांनाही प्राधान्य द्यावे, अशी मागणी पुढे येत आहे. एसी लोकलविषयी समाजमाध्यमावर करण्यात आलेल्या एका पोस्टवर प्रवाशांनी प्रतिक्रिया देत रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले आहेत.मुंबई उपनगरीय रेल्वे ही दररोज लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा मुख्य आधार आहे. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत साध्या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी एसी लोकलच्या सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी २३८ नवीन एसी लोकल सुरू तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिली एसी लोकल २०२७ मध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण २३८ लोकल २०३० पर्यंत उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे.एसी लोकलच्या संख्येत वाढ होत असताना साध्या लोकलच्या फेऱ्यांचे नियोजनही प्रवाशांच्या गरजेनुसार करावे, अशी मागणी आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत कामगार, विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर साध्या लोकलवर अवलंबून असतो.
त्यामुळे एसी लोकलचा विस्तार करताना साध्या लोकलच्या फेऱ्यांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर करण्यात आलेल्या एका पोस्टमधून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. ‘एसी लोकल जास्त नाही, चालवल्या तरी चालेल; पण साध्या लोकलही चालवा आणि वेळेवर येऊ द्या’, अशी मागणी या पोस्टमधून करण्यात आली आहे. या पोस्टवर प्रवाशांनी विविध प्रतिक्रिया देत साध्या लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.
‘एसी लोकल बंद करा. कोणताही प्रवास करताना त्यातून जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करू शकतील अशा गाड्या सुरू करा’, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली आहे. तर एसी लोकलच्या तुलनेत साध्या लोकलमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या गरजेला प्राधान्य देत साध्या लोकलच्या फेऱ्या आणि त्यांचे वेळापत्रक कायम ठेवावे, अशी अपेक्षा अन्य प्रवाशांनी व्यक्त केली आहे!
8
