Ambernath: अंबरनाथमध्ये संतापजनक घटना… १३ वर्षीय भाचीवर मामाकडून अत्याचार!
अंबरनाथ: दवाखान्यात नेण्याच्या बहाण्याने मामानेच अल्पवयीन भाचीवर अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आलीय. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्यात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ वर्षीय पीडितेला दंत रुग्णालयात उपचारासाठी नेताना ४० वर्षीय नराधमाने चारचाकी वाहनात अत्याचार केला.
रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने नराधमाने अनेकदा चारचाकी वाहनात अल्पवयीन पीडितेचं लैंगिक शोषण केलं. त्याचबरोबर त्यानं मुलीच्या घरी जाऊन अश्लील वर्तन केल्यानं मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेऊन नराधमाच्या विरोधात तक्रार केली.
नराधम हा पीडित मुलीच्या आईचा मानलेला भाऊ असून त्यानं पीडित मुलीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने आठ ते दहा वेळा चारचाकी वाहनात तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून नराधमाला ताब्यात घेतलंय!
