Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!
मुंबई

Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!

Aug 9, 2026

मुंबई, ता. ०८ : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ही शिखर संघटना या परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम ठरणार आहे. छोट्या अर्बन बँकांनाही आधुनिक बँकिंग सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.NUCFDCच्या ‘शारदा सदन’ येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार विभागाचे सचिव डॉ. आशिष कुमार, NUCFDCचे अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, NAFCUBचे अध्यक्ष व्ही. हनुमंत गौडा पाटील, उपाध्यक्ष मिलिंद काळे, महाराष्ट्र फेडरेशनच्या वैशाली आवारे, सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव रमण कुमार, संचालक कुमार रामकृष्ण, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, SVC बँकेचे अध्यक्ष दुर्गेश चांदावरकर, गुजरात फेडरेशनचे जितेंद्रभाई शाह, NUCFDCचे संचालक सुनील सौदागर आणि गोपीनिडी मदनस्वामी यांच्यासह सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

“भारताला समृद्ध बनवायचे असेल तर प्रत्येक भारतीयाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे लागेल. स्वयंरोजगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे काम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका करू शकतात. सहकारातून समृद्धीचा हा प्रवास आता अधिक वेगाने पुढे नेण्याची वेळ आली आहे,” असा संदेश अमित शाह यांनी दिला.अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला दीर्घकाळापासून एका सक्षम शिखर संघटनेची आवश्यकता होती. या संघटनेला मान्यता मिळाल्यानंतर आता तिचे स्वतंत्र कार्यालयही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे देशभरातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना एका सशक्त प्रणालीशी जोडून त्यांना आधुनिक सेवा देण्याचे काम अधिक वेगाने करता येईल, असे अमित शाह म्हणाले.

आजच्या काळात बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठे आव्हान तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षेचे आहे. त्यामुळे NUCFDCच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग, क्लाऊड सेवा, पेमेंट सिस्टीम, लोन ओरिजिनेशन, डेटा सुरक्षा आणि सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (SOC) यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.सायबर हल्ल्यांपासून अर्बन बँकांचे संरक्षण करण्यासाठी २४ तास देखरेख आणि तातडीचे मार्गदर्शन देणारी यंत्रणा उभारली जात आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने या सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचा सदस्य होण्याचे आवाहनही शाह यांनी केले.आजचा ग्राहक तत्काळ आणि डिजिटल बँकिंग सेवांची अपेक्षा करतो. त्यामुळे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी पारंपरिक बँकिंगपुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे आहे. मोठ्या बँकांकडे उपलब्ध असलेल्या सुविधा छोट्या अर्बन बँकांनाही परवडणाऱ्या खर्चात मिळाव्यात, हा NUCFDCचा प्रमुख उद्देश आहे.कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, संशोधन, आवश्यक सॉफ्टवेअर, डिजिटल फॉरेन्सिक क्षमता आणि व्यावसायिक मार्गदर्शन यासाठीही शिखर संघटनेच्या माध्यमातून व्यवस्था केली जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचे महत्त्व केवळ बँकिंग व्यवसायापुरते मर्यादित नाही. छोटा दुकानदार, व्यापारी, कुटीर उद्योग, महिला उद्योजक, स्थानिक व्यवसाय आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात या बँकांची महत्त्वाची भूमिका आहे.मोठ्या उद्योगांना मोठ्या भांडवलाची गरज असते; मात्र सहकाराच्या माध्यमातून छोट्या-छोट्या भांडवलाची एकत्रित ताकद निर्माण करून मोठी आर्थिक निर्मिती करता येते. ‘सहकारातून समृद्धी’चा अर्थ केवळ बँक समृद्ध होणे नाही, तर बँकेच्या माध्यमातून ग्राहक आणि स्वयंरोजगार निर्माण करणारा नागरिक समृद्ध होणे आहे, असे शाह यांनी स्पष्ट केले.

NUCFDCच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ८ ऑगस्टचा दिवस निवडण्याचे महत्त्वही अमित शाह यांनी अधोरेखित केले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनाचा नारा दिला होता. त्याच ऐतिहासिक दिवशी देशातील प्रत्येक तालुक्यापर्यंत अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगचे सक्षम नेटवर्क पोहोचविण्याच्या उद्देशाने नव्या कार्यालयात प्रवेश होत असल्याचे त्यांनी सांगितले.अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगमध्ये महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रासोबत गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील सहकारी बँकिंग क्षेत्राची ताकद एकत्रित केल्यास देशातील मोठ्या संख्येने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना आधुनिक सेवा उपलब्ध करून देता येतील, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.प्रत्येक बँकेने स्वतंत्रपणे डिजिटल तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि इतर आधुनिक सुविधा उभारण्यापेक्षा शिखर संघटनेच्या माध्यमातून या सुविधा सामायिक स्वरूपात उपलब्ध झाल्यास खर्च कमी होईल आणि छोट्या बँकांनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला सक्षम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडच्या काळात घेतलेल्या विविध निर्णयांचाही शाह यांनी उल्लेख केला. नियामक आणि सहकारी बँकिंग क्षेत्रातील संवाद वाढविण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे या क्षेत्राला नवीन संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.आता या संधींचा उपयोग करून अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि ग्राहकांचा विश्वास यांना केंद्रस्थानी ठेवावे. NUCFDCच्या माध्यमातून अर्बन बँकिंग क्षेत्राला जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *