Auto – taxi fare increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री: मुंबई आणि पुण्यात आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला!
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुण्यातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च या सर्व घटकांमुळे मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (MMRTA) रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. त्यानुसार सुधारित भाडेदर आज, १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.या भाडेवाढीनुसार, मुंबईसह उपनगरांमध्ये ऑटो-रिक्षाचे किमान भाडे १ रुपयाने वाढले असून ते २६ रुपयांवरून २७ रुपये झाले आहे, तर प्रति किलोमीटर दर १७.१४ रुपयांवरून १८.२२ रुपये करण्यात आला आहे.
दुसरीकडे, काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे किमान भाडे २ रुपयांनी वाढून ३१ रुपयांवरून ३३ रुपये झाले आहे. पहिल्या दीड किलोमीटर प्रवासासाठी प्रवाशांना ३३ रुपये मोजावे लागतील, तर प्रति किलोमीटर दर २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपयांपर्यंत वाढवला आहे.नवीन दर लागू झाले असले तरी, ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्यांच्या इलेक्ट्रॉनिक भाडे मीटरमध्ये सुधारित दर समायोजन (Recalibration) केल्यानंतरच नवीन भाडे आकारता येणार आहे.
ज्या वाहनांचे मीटर अद्याप अपडेट झालेले नाहीत, त्यांच्या चालकांना आरटीओने मंजूर केलेला अधिकृत भाडे तक्ता (Tariff Card) दाखवूनच नवीन दरानुसार पैसे घेता येतील. आजपासून लागू झालेल्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे!
