Bank closed: मोठी बातमी….लागोपाठ चार दिवस बँका राहणार बंद… पाहा कारण आणि तारीख!
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांनी ११ सप्टेंबर रोजी देशभरात संपाची घोषणा केली आहे. तुम्ही बँकांमध्ये व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, ग्राहकांना सलग चार दिवस बँकिंग सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ११ सप्टेंबरला शुक्रवार असल्यामुळे संपाचा फटका बसणार आहे, तर त्यांनतर १२ सप्टेंबर (शनिवार) आणि १३ सप्टेंबर (रविवार) या साप्ताहिक सुट्ट्या आहेत. त्यातच १४ सप्टेंबरला काही राज्यांमध्ये गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने काही भागांत बँका सलग चार दिवस बंद राहण्याची शक्यता आहे.
मात्र, सुट्ट्यांमुळे होणारा परिणाम राज्यनिहाय वेगळा असू शकतो.UFBU च्या मते, हा संप प्रामुख्याने तीन मोठ्या कारणांमुळे पुकारण्यात येत आहे. यात आठवड्यात पाच दिवस बँका सुरू ठेवण्याचा निर्णय रखडणे, परफॉर्मन्स लिंकड् इन्सेंटिव्ह (PLI) संदर्भातील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित मागण्यांचा समावेश आहे. मार्च २०२४ मध्ये भारतीय बँक संघ (IBA) सोबत झालेल्या १२ व्या द्विवार्षिक करारात आठवड्यात सोमवार ते शुक्रवार पाच दिवस बँकिंग करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. यासाठी दररोज कामाचे तास ४० मिनिटांनी वाढवण्याचा प्रस्ताव होता, मात्र सरकारची अंतिम मंजुरी अजूनही प्रलंबित असल्याचा दावा संघटनांनी केला आहे.
UFBU ने सरकार आणि बँक व्यवस्थापनाला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या या मागण्यांकडे लक्ष दिले गेले नाही तर २८ सप्टेंबरपासून सलग तीन दिवसांचा संप केला जाईल. ही वेळ बँकांच्या सहामाही लेखा-जोख्याच्या दिवसांशी संबंधित असल्याने बँकिंग व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून अनिश्चितकालीन संप करण्याचा इशाराही बँक संघटनांनी दिला आहे!
