Bhivandi: भिवंडीत उपचाराच्या नावाखाली महिलेवर लैंगिक अत्याचार; मौलवीला भायखळा स्थानकातून अटक!
भिवंडी शहरात आजार बरा करण्याच्या नावाखाली आणि तंत्र-मंत्राचा वापर करून एका ३० वर्षीय महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला एका खाजगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. तिच्या आजारपणामुळे नातेवाईकांनी तिला २०२४ मध्ये भिवंडीतील एका दर्ग्यात उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला होता.दर्ग्यातील ५० वर्षीय मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख याने आजार बरा करण्याचे आश्वासन देऊन महिलेवर अघोरी विधी आणि तंत्र-मंत्र करण्यास सुरवात केली. विधीच्या नावाखाली त्याने महिलेला अयोग्य स्पर्श करण्यास सुरुवात केली. महिलेने याला विरोध केला असता, ही विधी करावीच लागेल असे सांगून त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर मौलवीने रात्रीच्या वेळी तिला दर्ग्यात बोलावून तिच्यावर सलग काही दिवस अत्याचार केले.
या दरम्यान आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे व शारीरिक संबंधांचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी तिला फोनवरून दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच घाबरलेल्या व खचलेल्या महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मौलवीविरोधात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ मधील कलम ३, तसेच ‘माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००’ मधील कलम ६६ (ई) आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, आरोपी मौलवी पोलिसांना चकवा देऊन उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तातडीने माग काढून त्याला भायखळा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. या प्रकरणातील कथित व्हिडिओ नेमके कोणी तयार केले, ते कुठे व कसे व्हायरल झाले, तसेच या गुन्ह्यात मौलवीसोबत आणखी कोणी सहभागी आहे का, या सर्व बाबींचा अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत!
