Thane: अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात RTO कडून कडक कारवाईला सुरुवात; मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सांगता!
ठाणे १६ : ठाणे येथे अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येत नसल्यास परवाना मिळणार नाही, या भूमिकेवर ठाम राहिलेले परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या गृहक्षेत्रात ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियाना’ची सांगता सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात होणार आहे. या उपक्रमाला राज्यातील काही हिंदी भाषिक गटांकडून विरोध झाला होता. आजही अनेक ठिकाणी रिक्षा, टॅक्सी चालक मराठी शिकणार नाही, अशा भूमिकेत असतानाही प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका कायम ठेवली. अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देण्यात आलेली मुदत १५ ऑगस्टला संपली असून, सोमवारपासून प्रादेशिक परिवहन विभागाकडून नियमांची अंमलबजावणी तीव्र होण्याची शक्यता आहे.
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी भाषा येत नसल्याने यापूर्वी वाद झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई आणि महानगर क्षेत्रातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याची सूचना केली होती. या निर्णयाला मुंबईतील काही रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी विरोध केला, त्यामुळे या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान मिळावे आणि प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, या उद्देशाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात आले.या अभियानांतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरली जाणारी मराठी वाक्ये तसेच प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. या अभियानाचा सांगता समारंभ सोमवारी सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. अभियानाची सांगता झाल्यानंतर सोमवारपासून मराठी भाषेचे आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे!
