Bjp News – मुंबई भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; अमित साटम यांचा महापौरांना आणि नगरसेवकांना कडक इशारा!
ताज्या बातम्या राजकारण

Bjp News – मुंबई भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; अमित साटम यांचा महापौरांना आणि नगरसेवकांना कडक इशारा!

Aug 25, 2026

मुंबई महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत खडाजंगी झाली. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सज्जड दम दिला. “मुंबई महानगरपालिकेत काही चुकीचे निर्णय झाल्यास सर्वस्वी तुम्ही चौघे जबाबदार असाल,” असे ते म्हणाले. एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढील निधी दिला जाणार असल्याचे देखील अमित साटम यांनी स्पष्ट केले.मुंबई महानगरपालिकेत भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने सोमवारी सर्व नगरसेवकांची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. नगरसेवकांच्या बैठकीअगोदर महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांच्यात बैठक झाली.

मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सर्व भाजप नगरसेवकांची बैठक घेत पुढील ध्येय-धोरणे, वॉर्ड स्तरावर कामे, निधी इत्यादीवर चर्चा करून सूचना केल्या आहेत.मुंबई महापालिका सभागृहात व अन्य समित्यांमध्ये भाजप नगरसेवकांकडून उपस्थित केले जाणारे हरकतीचे मुद्दे आणि ठरावाच्या सूचना, विरोधकांकडून सातत्याने होणारी टीका आणि सभागृहात सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ ठरणारे विरोधक यासह अन्य मुद्द्यांवरून भाजपच्या नगरसेवकांना मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी समज दिली.”मुंबईकरांना गृहीत धरू नका. तुमच्या एका वर्षाच्या कामगिरीवरच पुढचा निधी उपलब्ध होईल,” असे खडेबोल अमित साटम यांनी सर्व नगरसेवकांना सुनावले. यापुढे महापालिका सभागृहात आणि अन्य समितीमध्ये घेण्यात येणारे हरकतीचे मुद्दे महापौर व सभागृह नेते गणेश खणकर यांच्याशी चर्चा करूनच मांडावेत, असे देखील यावेळी सांगण्यात आले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *