छत्रपती संभाजी नगर ०८: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी गावातील एका नामांकित शाळेत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शाळेतील मध्यंतराच्या (लंच ब्रेक) सुट्टीत विद्यार्थ्यांच्या दोन गटांत ‘धक्का का दिला’ या किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि एका संतापलेल्या १०वीच्या विद्यार्थ्याने “थांबा तुम्हाला बघतोच” अशी धमकी दिली. त्यानंतर कोणाला काही समजण्याच्या आतच त्याने खिशातील पॉकेट चाकू काढून आपल्याच चार वर्गमित्रांवर सपासप वार केले.या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या दंडावर, एकाच्या पायावर तर एकाच्या पाठीवर गंभीर वार झाले.
हल्ल्यात जखमी झालेल्या चारही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शाळेत अशा प्रकारचा चाकू हल्ला होण्याची ही पहिलीच घटना नाही; यापूर्वी नांदेडमध्येही एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी क्षुल्लक वादातून वर्गमित्रावर चाकूने हल्ला केला होता. शालेय विद्यार्थ्यांपर्यंत ही धारदार शस्त्रे पोहोचतातच कशी, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बॅगांची कसून तपासणी करणे गरजेचे बनले आहे, तसेच आपले मूल शाळेत काय घेऊन जात आहे यावर पालकांनीही लक्ष ठेवणे तितकेच आवश्यक आहे!
