Maharashtra Milk price Hike : महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार!
ठळक बातम्या माहिती

Maharashtra Milk price Hike : महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ महागणार!

Aug 8, 2026

महाराष्ट्र ०८: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या खिशाला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. राज्यात मंगळवार, ११ ऑगस्टपासून गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन वाढीमुळे गाईचे दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलीटर, तर म्हशीचे दूध ७६ रुपयांवरून ७८ रुपये प्रतिलीटर होणार आहे. केवळ दूधच नाही, तर इतर विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही १० टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे.पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज डेअरी) येथे संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांच्या शिखर संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत वाढत्या उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर प्रतिलीटर सुमारे १० रुपयांनी, साखरेचे भाव प्रतिकिलो १२ रुपयांनी वाढले असून पॅकिंगच्या खर्चातही ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याशिवाय दूध खरेदीचे दरही वाढल्यामुळे एकूणच दूध व्यवसायाचा खर्च वाढून उत्पादकांवर मोठा आर्थिक ताण आला होता.उत्पादन, पॅकिंग आणि वाहतुकीचा हा वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी तसेच दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ही दरवाढ करणे आवश्यक असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या महत्त्वाच्या बैठकीला प्रमुख सहकारी व खासगी दूध संघांचे सुमारे २० प्रतिनिधी उपस्थित होते. याच वेळी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरुण सिताराम चांभारे यांचा सत्कार करण्यात आला, तसेच ॲनालॉग पनीरवरील बंदीच्या प्रक्रियेत सहकार्य केल्याबद्दल आमदार विक्रम पाचपुते यांचेही आभार मानण्यात आले!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *