Delhi: एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची अचानक झालेली भेट;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
दिल्ली ०७: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला जात असतानाच, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते सातारच्या ‘दरे’ या आपल्या मूळ गावी तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते, परंतु दौरा सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी त्यांनी तो तडकाफडकी आटोपता घेतला आणि ते थेट दिल्लीला गेले.दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून देशभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, खाती वाटप आणि विविध विकासकामांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उद्धव ठाकरेंच्या ६ खासदारांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामे आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोर्टातील सुनावणीच्या ऐन काळात झालेल्या या अचानक दौऱ्यामुळे आणि भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे!
