पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद पवारांच्या या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील एकही उद्योग बाहेर जाणार नसून कंपनी बंद झाल्याच्या आकडेवारीचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. बंद पडलेल्या किंवा देशातील ७६ टक्के कंपन्या या ‘डीफक्ट’ (म्हणजे नोंदणी झालेल्या पण प्रत्यक्षात सुरूच न झालेल्या) होत्या.
२०१९-२० मध्ये केंद्र सरकारने विशेष मोहिमेअंतर्गत सुमारे ६ लाख निष्क्रिय कंपन्या ‘स्ट्राईक ऑफ’ केल्या होत्या. देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या गेल्या १० वर्षांत ६.७८ लाखावरून तब्बल २१.१७ लाखांवर पोहोचली असून ती तिपटीने वाढली आहे.महाराष्ट्रात आजही देशात सर्वाधिक कंपन्या असून ३ जून २०२४ रोजी ही संख्या ३,९६,२११ एवढी आहे. २०२५-२६ मध्ये ४१,५२५ नवीन कंपन्यांची नोंदणी झाली असून नवीन कंपन्यांच्या नोंदणीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगविश्वाबद्दल नकारात्मक चित्र निर्माण करणे चुकीचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, चाकण औद्योगिक परिसरातील समस्या मान्य असून संबंधित सर्व विभागांची १२ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले!
