Dharashiv: धाराशिवच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाला गळती; शिंदे सेनेची ताकद वाढली!
धाराशिव २३ : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा राजकीय हादरा बसला आहे. कळंब नगरपालिकेतील १० नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर, आता ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे यांनी पक्षाला रामराम ठोकत आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आणि समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढली असून, ठाकरे सेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही राजकीय घडामोड घडून आली. आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शनिवारी चेतन बोराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यानंतर धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी हा दुसरा सर्वात मोठा फटका मानला जात आहे.
पाथरूड जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे भूम तालुक्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धाराशिव हा ठाकरे सेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, पक्षात लागलेली ही गळती चिंतेची बाब ठरत आहे.या घडामोडीच्या काही दिवसांपूर्वीच कळंब नगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता, ज्यामुळे कळंब नगरपालिकेत भाजपची ताकद वाढली होती. त्यानंतर आता थेट शिंदे गटात झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरे सेनेची डोकेदुखी अधिक वाढली आहे!
