Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!
गुन्हे ताज्या बातम्या

Kalyan: कल्याणमध्ये भाजप नेत्याच्या मुलाची दादागिरी: गाडी बाजूला घेण्याच्या वादातून विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम चोप!

Aug 17, 2026

कल्याण १७ : कल्याण पश्चिमेत गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक वादातून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ ऑगस्ट रोजी बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख आणि त्याचे मित्र बाहेर गेले असताना गाडी बाजूला घेण्यावरून काही तरुणांशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर अथर्व हरवलेले पाकीट शोधण्यासाठी पुन्हा त्या परिसरात गेला असता, १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्याला घेरले. भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांवर हा हल्ला केल्याचा आरोप आहे.आरोपींनी अथर्वला रस्त्यावरून उचलून एका गोदामात डांबले आणि लाठी, बांबू तसेच लोखंडी रॉडने त्याच्या शर्टचे तुकडे होईपर्यंत बेदम चोप दिला.

या मारहाणीत अथर्वच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे. आपल्या मुलाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच अथर्वचे वडील सागर देशमुख यांनी थेट गोदामात धाव घेऊन त्याची सुटका केली. “आणखी पाच मिनिटे उशीर झाला असता, तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला पोलिसांनी योग्य प्रकारे तक्रार न घेतल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणाचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, १३ ऑगस्ट रोजी घटना घडूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने, पोलीस आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना कधी अटक करणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *