Kalyan: कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; १३० नागरिकांचा घेतला चावा, ११ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी!
आरोग्य

Kalyan: कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; १३० नागरिकांचा घेतला चावा, ११ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी!

Aug 10, 2026

कल्याण १० : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल ते खडकपाडा मार्गावर एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः तांडव माजवले आहे. या भीषण घटनेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल १२० ते १३० नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.या हल्ल्यात ११ वर्षांची अंकिता ही चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. जखमी झालेल्या बहुतांश नागरिकांना तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंकिताची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती डॉ. संदीप पगारे यांनी दिली.दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.

भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि नियंत्रणासाठी कल्याण-डोम्बिवली महानगरपालिका दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते; मात्र तरीही कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यात केडीएमसी प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.विशेष म्हणजे, ज्या रुक्मिणीबाई रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत, त्याच रुग्णालयाच्या आवारात भटके कुत्रे बिनधास्त फिरत असल्याचे व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते. सध्याही रुग्णालयात तीच बिकट परिस्थिती असून उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक प्रचंड दहशतीखाली आहेत. कोट्यवधींचा खर्च करूनही पालिका प्रशासन या जीवघेण्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, असा संतप्त सवाल आता कल्याणकर विचारत आहेत!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *