Thane: ठाण्यात तीन दिवसांत १,१८३ वाहनांची तपासणी; तर ८९ चालकांवर कारवाई!
ठाणे २५ : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर व टुरिस्ट वाहनचालकांना मराठी येते का, याची तपासणी मोहीम परिवहन विभागाने सुरू केली आहे. ठाण्यात गेल्या तीन दिवसांत १,१८३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ८९ चालकांना मराठी येत नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मराठी शिकणे हा केवळ नियम नसून प्रवाशांशी सुलभ संवाद साधण्याचा मार्ग आहे, याबाबतही या मोहिमेतून जनजागृती होत आहे.राज्य परिवहन विभागाने महाराष्ट्रात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर तसेच टुरिस्ट वाहनचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी येणाऱ्या वाहनचालकांना मराठी शिकता यावी, यासाठी राज्यभर मराठी भाषा शिकविण्याचे वर्गही आयोजित करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी सुरू केली आहे. गेल्या तीन दिवसांत अनुक्रमे ५००, ३५५ आणि ३२८ रिक्षा-टॅक्सींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनुक्रमे ३१, ३६ आणि २२ चालकांना नोटिसा देण्यात आल्या. एकूण १,१८३ वाहनांची तपासणी करून ८९ चालकांवर नोटीसची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.भाषा शिकणे म्हणजे महाराष्ट्राशी जोडले जाणे रिक्षा-टॅक्सी चालकांचा दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांशी थेट संपर्क येतो.
त्यामुळे प्रवाशांशी स्थानिक भाषेत संवाद साधता येणे ही सेवा अधिक सुलभ आणि विश्वासपूर्ण करण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच स्थानिक प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचे ज्ञान उपयुक्त ठरते. परराज्यातून रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या चालकांनी मराठी शिकण्याकडे केवळ नियम म्हणून न पाहता महाराष्ट्राच्या समाजजीवनाशी जोडणारे माध्यम म्हणून पाहण्याची गरज आहे!
