Manoj jarange: मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; कुणबी प्रमाणपत्राबाबत प्रसाद लाड यांची मोठी घोषणा!
Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांनी पाणी पिले असले, तरी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली.प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची भावनिक विनंती केली. ते म्हणाले की, मी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही तर तुमचा मोठा भाऊ म्हणून इथे आलो आहे.
जरांगे पाटील यांच्या १५ मागण्यांचे उत्तर पाठवण्यात आले असून, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे.या भेटीदरम्यान लाड यांनी महत्त्वाची घोषणा केली की, हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू केली जाईल आणि पहिले प्रमाणपत्र स्वतः जरांगे पाटील यांच्या हातात दिले जाईल. तसेच मंत्रालयात स्वतंत्र मराठा कक्ष स्थापन केला जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली जाईल. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संबंधित नोंदी लावल्या जातील अन् जिल्ह्यानुसार पेनड्राइव्ह पाठवण्यात आले आहेत. आपण ६ कोटी मराठे आहोत, त्यामुळे अर्जदारांनी अर्ज करणे आवश्यक आहे, असे सांगत शिंदे-फडणवीस सरकार जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले!
