Maratha reservation: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पेटला..जालन्यासह ४ जिल्ह्यांत कडकडीत बंद; राज्यभरात रस्ता रोको व उपोषणे तीव्र!
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील मागील ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले असून, त्यांची प्रकृती खालावल्यामुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. सरकारसोबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने ३ सप्टेंबर रोजी जालना, बीड, परभणी आणि लातूर या ४ जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले असून, तोडगा न निघाल्यास धाराशिव जिल्हाही बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारने तात्काळ निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे.
या बंददरम्यान चारही जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहतील, किरकोळ व ठोक दुकाने बंद राहतील आणि प्रमुख महामार्गांवरील वाहतूक रोखली जाण्याची शक्यता आहे. मात्र, वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, दूध पुरवठा, रुग्णवाहिका, आणीबाणीच्या सेवा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक संस्था सुरू राहतील.सध्या राज्यभरात ठिकठिकाणी रस्ता रोको आणि उपोषणे सुरू आहेत. जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वडीगोद्री फाट्यावर आंदोलकांनी ठिय्या मांडून ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा दिल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
लातूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच नांदेडच्या भोकर तहसील कार्यालयासमोर जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बालाजी पाटील बटाळकर या मराठा तरुणाचे गेल्या ४ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहील कठोर निर्धार त्यांनी व्यक्त केला!
