Mulund: मुलुंड स्थानकात ओव्हरहेड वायरवर बांधकाम साहित्य पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत!
मुलुंड : मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात सोमवारी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी एमआरव्हिसीच्या डेकचे काम सुरू असताना अचानक बांधकाम साहित्य ओव्हरहेड वायरवर पडल्याची घटना घडली. वायरवर साहित्य पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडाल्या, ज्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित मार्गावरील लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. या घटनेमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बांधकाम साहित्य बाजूला केले आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुपारी १२:१७ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत करण्यात आली असली, तरी सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या, ज्यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागला!
