Thane: ठाणे रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन सॅटीस प्रकल्पात सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला!
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील निर्माणाधीन ‘सॅटीस-दोन’ प्रकल्प परिसरात रविवारी सकाळी एका ६० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. अशोक साळुंखे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ठाणे महापालिकामार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी कामावर गेलेले साळुंखे रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला.
अखेर रविवारी सकाळी प्रकल्पाच्या तळभागातील एका मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह दिसून आल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने कोपरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणाची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून साळुंखे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे!
