Mumbai – उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!
ताज्या बातम्या राजकारण

Mumbai – उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!

Aug 19, 2026

मुंबई १९ – कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत मंगळवारी उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील महाराष्ट्र आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उबाठा गटाचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अमित भाद्रीचा, आशिष पढयार, विनायक डायरे तसेच मुंबई समन्वयक प्रथमेश बोऱ्हाडे, स्वप्नील सावंत, ॲड. दक्षता ठाकूर आणि सुशांत कावीर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेच्या सोशल मीडिया विभागाची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे.शिवसेना पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केले.

पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून शिवसेनेत दाखल झालेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी तसेच पक्षाचे विचार आणि विकासाचे काम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.सोशल मीडिया हे सध्याच्या काळातील जनतेशी थेट संवाद साधण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाचा योग्य आणि सकारात्मक पद्धतीने वापर करून शिवसेनेचे विचार, पक्षाची भूमिका, सरकारच्या माध्यमातून सुरू असलेली विकासकामे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी सोशल मीडिया विभागावर आहे.

त्यामुळे केवळ पक्षाच्या कार्यक्रमांपुरते सोशल मीडिया काम मर्यादित न ठेवता, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना आणि अपेक्षांना व्यासपीठ देण्याचे कामही सोशल मीडिया विभागाने करावे, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, उबाठा गटाच्या सोशल मीडिया विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाच्या सोशल मीडिया संघटनेला मुंबई तसेच महाराष्ट्राच्या पातळीवर आणखी बळ मिळाले आहे.

आगामी काळात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच पक्षाचे विचार आणि विविध विकासकामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून व्यापक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी शिवसेना सोशल मीडिया उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा, मुंबई विभाग प्रमुख राज कुळकर्णी, महादेव सलवडे, मयुर मगर तसेच सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *