Thane – राष्ट्रवादी – अजित पवार गटाला खिंडार ; कल्याण एपीएमसीच्या माजी अध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी (श.प.) मध्ये प्रवेश!
ठाणे १९ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला कल्याणमध्ये जोरदार खिंडार पडले आहे. कल्याण एपीएमसीचे माजी सभापती तथा संचालक भरतभाऊ गोंधळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत महेश तपासे आणि मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. ठाणे येथील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गटनेते अभिजीत पवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बर्डे, ठाणे महिलाध्यक्ष मनिषा भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, मिलींद बनकर आदी उपस्थित होते. कल्याण आणि परिसरात सक्रीय असलेले अजित पवार गटाचे हे कार्यकर्ते असून शरद पवार यांची विचारधारा आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी – अजित पवार गटाचे मा. जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे , प्रदेश सचिव रविंद्र कृष्णा परटोले , ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष ज्योतीताई वाघमारे , बंजारा समाज कल्याणचे अध्यक्ष सागर राठोड, मा. युवती अध्यक्षा आम्रपाली लोखंडे, मारुती खांडगे, ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष निलेश कडू – अंबरनाथच्या आरती उबाळे, सविता कांबळे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह शेकडो जणांनी प्रवेश केला.
यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच, वाट चुकलेले लोक एक ना एक दिवस स्वतःच्या घरात येतच असतात. सत्ता सोडून जेव्हा कार्यकर्ते परत येतात. तेव्हा समजून जा की सत्ता चुकीच्या दिशेने जाऊ लागली आहे. त्या पक्षात घुसमट होत असल्यानेच हे सर्व मोकळा श्वास घेण्यासाठी आमच्याकडे आले आहेत, असे सांगितले. तर गोंधळी यांनी, आपण अपेक्षा ठेवून आलेलो नाही. आम्ही शरद पवार यांचे समर्थक आहोत. संघटनेचे काम करणार आहोत!
