मुंबई ०८ : मुंबईतील पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासोबत अतिशय धक्कादायक गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या (GRP) हद्दीतील पुरुषांच्या डब्यात घडली. ट्रेनमधील सीटवर झोपण्याच्या कारणावरून एका पुरुष प्रवाशाचा या महिलेशी वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्या पुरुषाने महिलेला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि स्वतःचा कंबरेचा पट्टा काढून तिला मारण्याची भीती दाखवली. दुर्दैवाची बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार घडत असताना डब्यातील इतर सहप्रवासी गप्प राहून हा प्रकार पाहत होते, कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर अंधेरी जीआरपीने तत्परतेने कारवाई करत १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ती व्यक्ती महिला नसून ट्रान्सजेंडर असल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत ती व्यक्ती ट्रान्सजेंडर नसून महिलाच असल्याचे स्पष्ट झाले.पीडित महिला ही नेपाळची नागरिक असून अंधेरी जीआरपी सध्या तिचा शोध घेत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे!
