Navi Mumbai: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार जलद!
ताज्या बातम्या वाहतूक

Navi Mumbai: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार जलद!

Aug 11, 2026

नवी मुंबई ११: नवी मुंबई आणि रायगड परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काळात या मार्गावरून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे २९.६ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत या पाच स्थानकांचा विकास होणार आहे.या नव्या रेल्वे मार्गामुळे पनवेल आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना मुंबईकडे ये-जा करण्यासाठी अधिक जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

सध्या पनवेल-कर्जत प्रवासासाठी साधारण दीड तासाचा कालावधी लागतो. मात्र, नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास सुमारे ४० मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.मुंबई रेल्वे विकास महामंडळ अर्थात एमआरव्हीसीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. चिखले आणि मोहापे येथील भूमिगत मार्गांचे काम पूर्ण झाले असून, मार्गावरील काही महत्त्वाचे पूल आणि संरचनांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. स्थानिक वाहतुकीसाठी रोड ओव्हर ब्रिज क्रमांक ८९/१ आणि ९०/२ खुले करण्यात आले आहेत. तसेच बोगदा क्रमांक १ आणि ३ मधील केबलिंगची कामे पूर्ण झाल्याची माहिती आहे.रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामालाही मोठी गती मिळाली असून, या अंतर्गत ओव्हरहेड इक्विपमेंट आणि कॉन्टॅक्ट वायर टाकण्याचे काम करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ड्रॉपर वायरचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे.या मार्गामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या नेटवर्कमध्ये आणखी एका महत्त्वाच्या मार्गाची भर पडणार असून, पनवेल-कर्जत परिसरातील नागरिकांना मुंबईकडे प्रवास करण्यासाठी मोठी सुविधा मिळणार आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा तपासणीची प्रक्रिया होऊन लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *