Ncp : राष्ट्रवादी महिला आघाडीत नवे नेतृत्व: रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई ०५: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी ही नवी निवड झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि तळागाळातील कार्यकर्त्या म्हणून वैशाली नागवडे यांची ओळख आहे. त्या मूळच्या दौंडच्या असून त्यांनी पुणे ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभारले आहे.
त्यांच्या या संघटनात्मक कौशल्याची दखल घेऊन पक्षाने यापूर्वी त्यांच्यावर ‘महानंदा दूध’च्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती.पक्षामध्ये रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे नागवडे सातत्याने चर्चेत होत्या. आता थेट त्यांच्याच जागी निवड झाल्याने आगामी काळात राष्ट्रवादीची महिला आघाडी अधिक आक्रमक आणि बळकट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षातील पदाधिकारी व समर्थकांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे!
