Nursing paper leak: परभणीत नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटला; सख्ख्या बहिणीला मदत करण्यासाठी महिला पर्यवेक्षिकेचा पराक्रम, ५ जणांवर गुन्हा दाखल!
परभणी:राज्यात नीट आणि टीईटी परीक्षेतील घोटाळ्यांची चर्चा ताजी असतानाच आता परभणीमध्ये नर्सिंग परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे राज्यातील शिक्षण आणि आरोग्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील एका परीक्षा केंद्रावर नर्सिंगची परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला. वर्गात प्रश्नपत्रिकांचे वाटप झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच तिथे कार्यरत असलेल्या महिला पर्यवेक्षिकेने आपल्या मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले आणि व्हॉट्सअॅपवरून स्वतःच्या सख्ख्या बहिणीला पाठवले. परीक्षा सुरू असतानाच प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याने परीक्षेच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांनी अचानक घेतलेल्या झाडाझडतीमध्ये हा गैरप्रकार तात्काळ उघडकीस आला. याप्रकरणी परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यात महिला पर्यवेक्षिकेसह एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून महिला पर्यवेक्षक राखी राजेश चव्हाण, तिची बहीण राणी राजेश चव्हाण यांच्यासह प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, हा फोटो नक्की कोणाकोणाला पाठवण्यात आला होता? तो पुढे इतर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला? तसेच यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत!
