Pratap sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती कायम; १ वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!
ताज्या बातम्या

Pratap sarnaik: अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती कायम; १ वर्षाची मुदतवाढ दिल्यानंतर परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Aug 29, 2026

महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा बोलण्याची सक्ती रद्द करण्यात आलेली नसून, ती शिकण्यासाठी फक्त एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ही मुदत संपल्यानंतर मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे.यापूर्वी परिवहन विभागाने मराठी भाषा न येणाऱ्या अमराठी चालकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. यामुळे चालकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईच्या नोटीसांना स्थगिती देत, भाषा शिकण्यासाठी दिलेली ४ महिन्यांची मुदत वाढवून १ वर्ष केली.

या निर्णयामुळे अमराठी चालकांनी मुंबईत भोजपुरी गाणी वाजवून जल्लोष केला होता, तर विरोधकांनी शिवसेनेला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याची टीका केली होती.यावर स्पष्टीकरण देताना सरनाईक म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक आहे. राज्यातील १० लाख अमराठी चालकांपैकी १ लाख ६५ हजार ६०० चालकांना आतापर्यंत मराठी शिकवण्यात आले आहे.उरलेल्या चालकांसाठी १ ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यभरात मराठीचे वर्ग सुरू केले जातील.

ही मुदत २८ ऑक्टोबर २०२७ रोजी संपणार असून, त्यानंतर लगेचच दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई पुन्हा सुरू केली जाईल. “कुणीही मराठीचा अभिमान आणि तिच्या अस्मितेशी खेळू नये, सर्वांनी मराठी भाषेचा आदर केलाच पाहिजे,” असे सांगत त्यांनी उन्माद न करण्याचा इशारा दिला!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *