Pratap sarnaik: रस्त्यावरची एक चूक एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’…रस्ता सुरक्षा जनआंदोलन करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन!
‘ठाणे, दि. ३१ : रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून, अनेकदा एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा परिवहन विभागाची जबाबदारी नसून, प्रत्येक वाहनचालक, पादचारी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘Traffic School on Wheels’ या अभिनव उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, कल्याण-डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज नवनाथ शिरसाट यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली जबाबदारी आहे, असे सांगून मंत्री सरनाईक म्हणाले की, वाहतूक नियमांचे महत्त्व केवळ दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या मनात रुजले पाहिजे. यासाठी वाहतूकविषयक शिक्षण नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणारा ‘Traffic School on Wheels’ हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरेल.या फिरत्या वाहतूक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, वाहनचालक, व्यावसायिक चालक तसेच सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालकाचे वर्तन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन, लेन शिस्त तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
‘मला काही होणार नाही’ हा आत्मविश्वास रस्त्यावर सर्वात मोठा धोका ठरू शकतो. मोबाईलवर बोलत किंवा संदेश पाठवत वाहन चालविणे, अतिवेगाने वाहन चालविणे, हेल्मेटचा वापर न करणे आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे या सवयी अपघातांना निमंत्रण देतात. त्यामुळे विशेषतः तरुणांनी रस्ता सुरक्षेला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.*रस्ते अपघातांतील सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी व दुचाकीस्वारांचे*मंत्री सरनाईक म्हणाले की, देशातील रस्ते अपघातांमध्ये पादचारी आणि दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असल्याचे २०२३च्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. भारतात २०२३मध्ये वर्षभरात ३५,२०३ पादचारी आणि ७७,५३९ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सरासरी ९६ पादचारी आणि २१२ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागतो.
महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर असून, २०२३मध्ये ३,११० पादचारी आणि सुमारे ७,७८२ दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला. राज्यात दररोज सरासरी ८ ते ९ पादचारी आणि २१ दुचाकीस्वार रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. राज्यातील एकूण रस्ते अपघाती मृत्यूंपैकी सुमारे २० टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे, तर जवळपास निम्मे मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे एकूण अपघाती मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू पादचारी आणि दुचाकीस्वारांचे असल्याचे त्यांनी सांगितले.ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशात वाहनांची संख्या तसेच वाहतुकीची गुंतागुंत झपाट्याने वाढत असताना, केवळ वाहतूक व्यवस्थापन पुरेसे नाही. चांगले रस्ते, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि शिस्तबद्ध वाहनचालक या तिन्हींच्या समन्वयातूनच सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
परिवहन विभागाच्या माध्यमातून वाहतूक नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार ठाणे व मिरा -भाईंदर येथे वाहतूक उद्यान (ट्राफिक गार्डन) उभारण्यात आले असून राज्यातील सर्व परिवहन कार्यालयाजवळ ‘धर्मवीर आनंद दिघे वाहतूक उद्यान’ उभारण्यात येणार आहेत. असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.‘Traffic School on Wheels’ ही केवळ फिरती शाळा न राहता, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात रस्ता सुरक्षेचा संदेश पोहोचविणारे प्रभावी जनआंदोलन बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली!
