Ravindra Chavhan: शिवसेना-मनसेच्या मैत्रीवरून रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर सध्या शिवसेना शिंदे गट.आणि मनसे यांच्यात वाढणारी जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “काही जणांची दोस्ती ही ‘शोले’ चित्रपटासारखी असते, आणि त्या मैत्रीचा काय शेवट होतो हे सर्वांनाच ठाऊक आहे; त्यामुळे यामध्ये समोरच्यालाच जास्त धोका असतो,” असे वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे. थेट कोणाचेही नाव न घेता त्यांनी या मैत्रीबाबत मनसेला अप्रत्यक्षपणे सावध करण्याचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जानेवारी २०२६ मध्ये मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्तेची गणिते बदलली आणि भाजप, शिंदे गट व मनसे हे सगळे महापालिकेत एकत्र आले. मात्र, वरवर राजकीय समीकरण जुळलेले दिसत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गट-मनसे यांच्यात अंतर्गत तणाव कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून रवींद्र चव्हाणांवर टीका सुरू आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटातही स्थानिक पातळीवर मतभेद आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘शोले’तील जय-वीरूच्या मैत्रीचा दाखला देत चव्हाणांनी दिलेला हा इशारा चांगलाच लक्षवेधी ठरला आहे.
अलीकडेच डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, मात्र भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीपासून दूर राहिले. यामुळे शिंदे गट व मनसेमधील वाढती जवळीक आणि भाजपसोबत निर्माण झालेले राजकीय अंतर स्पष्टपणे समोर आले आहे. चव्हाणांच्या या धक्कादायक विधानानंतर आता मनसे नेते राजू पाटील आणि शिवसेना शिंदे गट यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे!
