Kalyan: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार; राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत उत्तर भारतीयांच्या ताकदीचा केला दावा!
कल्याण १८ : कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.हिंदी भाषिक समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या भूमिकेचे उघडपणे समर्थन केले. वक्तव्य करताना परब म्हणाले, “मी ब्रिजभूषण सिंह यांना सलाम ठोकतो. त्यांनी केवळ एक धक्का दिला आणि ‘उत्तर प्रदेशात येऊन दाखवा’ असे आव्हान दिले, तर राज ठाकरे तिथे गेलेच नाहीत.
उत्तर भारतीय माणसाने आपली ताकद दाखवून दिली.” तसेच, “गरीबांना तर कोणीही मारू शकतो,” अशा आशयाचे वक्तव्यही त्यांनी या वेळी केले.हिंदी भाषिक समाजाच्या मंचावरून भाजपच्या जबाबदार जिल्हाध्यक्षाने राज ठाकरेंबाबत असा एकेरी उल्लेख आणि वादग्रस्त विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
विशेषतः महाराष्ट्रातील ‘मराठी विरुद्ध उत्तर भारतीय’ या वादाच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, यावरून मनसे आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आता मनसे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!
