Sanjay Raut ०८: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू असतानाच राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीर खासदारांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. या भेटीवरून खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आणि गंभीर आरोप केला आहे.संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या पक्षपाती वर्तनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, २५ वर्षे खासदार असलेल्या आम्हाला, राहुल गांधींना किंवा काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या पक्षांच्या विरोधी खासदारांना पंतप्रधान चहापानासाठी का बुलावत नाहीत?
विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांमध्ये चर्चा होणे ही लोकशाहीची परंपरा आहे, पण इथे केवळ एकांगी वर्तन सुरू आहे.या भेटीदरम्यानचा किस्सा सांगताना राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी आमच्या फुटीर सहा खासदारांना ढोकळा आणि जिलेबी भरवत होते. ढोकळा खाताना एका खासदाराच्या घशात तो अडकला, तेव्हा मोदींनी त्याच्या छातीवरून हात फिरवला असे लोक सांगत आहेत. यावरून पंतप्रधान त्या फुटीर खासदारांच्या पाठीशी असल्याचे दाखवून देत आहेत. खरं तर गद्दारीचे प्रकरण न्यायालयात सुरू असताना “मी तुमच्या पाठीशी आहे” असा संदेश देणे म्हणजे न्यायालयावर दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे.
गेल्या १५ दिवसांपासून संसदेचे अधिवेशन सुरू असूनही पंतप्रधान सभागृहात आलेले नाहीत, असा टोला लगावताना राऊत म्हणाले की, तिकडे आल्यावर आम्हीही तुम्हाला खिचडी, फाफडा आणि जिलेबी देऊ. तृणमूल काँग्रेस आणि ६ फुटीर खासदारांचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना त्यांना भेटणे म्हणजे पक्षांतराला थेट समर्थन देणे आहे. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांना पाठीशी घालणे हा संविधानाचा सर्वात मोठा अपमान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या फुटीर खासदारांना भेटून न्यायालयावर दबाव आणण्याचा गुन्हा केला आहे, असा घणाघाती आरोप राऊतांनी केला!
