NEET PAPER  LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!
गुन्हे शिक्षण

NEET PAPER LEAK : नीट पेपर फुटी प्रकरणात CBI चार्जशीटमधून NTA च्या ३ तज्ज्ञांसह १३ जणांवर गंभीर आरोप!

Aug 8, 2026

नीट पेपरफुटी प्रकरण ०८: देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मधील गोपनीय विषयतज्ज्ञ, मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेस ऑपरेटर यांच्यातील मोठे रॅकेट उघडीस आले असून ही एका सुनियोजित गुन्हेगारी कटाची फलश्रुती असल्याचे CBI च्या तपासात निष्पन्न झाले आहे.

सीबीआयने या हाय-प्रोफाईल प्रकरणात एकूण १३ जणांविरुद्ध चार्जशीट दाखल केले आहे. यामध्ये NTA च्या तीन मुख्य विषयतज्ज्ञांचा समावेश असून, बायोलॉजी तज्ज्ञ मनीषा मांढरे, फिजिक्स तज्ज्ञ प्रल्हाद कुलकर्णी आणि केमिस्ट्री तज्ज्ञ मनीषा हवालदार यांचा यात थेट सहभाग आढळला आहे. या तज्ज्ञांनी आपल्या पदाचा, गोपनीयतेचा आणि अधिकाराचा गैरवापर करत प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या आणि संपूर्ण पुरवठा साखळीच्या माध्यमातून ही माहिती लीक केली.

तपासातील माहितीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये या आरोपींनी प्रश्नपत्रिका थेट न फोडता त्यातील महत्त्वाचे प्रश्न आणि मजकूर बाहेर काढला होता. त्यानंतर प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी पुण्यातील आपल्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग आयोजित केले. तिथे सराव परीक्षा घेण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांना तोंडी प्रश्न सांगून ते त्यांच्या वहीत लिहून घेण्यास सांगितले जात असे.

हे गोपनीय प्रश्न मध्यस्थ आणि कोचिंग क्लासेसच्या संचालकांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात आली. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परीक्षा साहित्याचा दुरुपयोग करून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणाऱ्या या रॅकेटचे इतर आर्थिक धागेदोरे आणि सहभागी मध्यस्थांचा शोध सीबीआयकडून अजूनही घेतला जात आहे!

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *