Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासदृष्टीला चिरंतन करणारे स्मारक; नातू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कृतज्ञ आदरांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण!
ताज्या बातम्या न्यूज सातारा

Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासदृष्टीला चिरंतन करणारे स्मारक; नातू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कृतज्ञ आदरांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण!

Aug 16, 2026

सातारा, दि. १६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकल बोर्ड साताऱ्याचे अध्यक्ष होते. त्यांनी त्याकाळात घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयांमुळे सातारा जिल्ह्याचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय असे राहिलेले आहे. यांच्या कार्याला अभिवादन करणाऱ्या भव्य तेलचित्ररूपी स्मारकाचे आज सातारा शहरातील पोवई नाका परिसरात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

विशेष म्हणजे, या स्मारकाच्या उभारणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी मोलाचा पुढाकार घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शन, सहकार्य आणि पाठबळामुळे हे स्मारक प्रत्यक्षात साकार झाले. त्यामुळे ज्यांनी या स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला, त्यांच्याच हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे त्याचे लोकार्पण होणे हा अत्यंत भावनिक, अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी ग्रामीण विकास, सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हे स्मारक उभारण्यात आले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागातही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर आपली अमिट छाप उमटवली. विकासाचा दूरदर्शी विचार, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीची बांधिलकी आणि समाजसेवेचा वसा यामुळे ते जनमानसात आजही अजरामर आहेत.*या महान कार्याला त्यांचे नातू तथा राज्याचे पर्यटन मंत्री मा. शंभूराज देसाई यांनी स्मारकरूपी आदरांजली वाहिली आहे.* आपल्या आजोबांच्या कार्याचा इतिहास, विचार आणि समाजहिताची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पोवई नाका परिसरातील हे स्मारक सातारा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार असून, येथून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या महान कार्याची आणि विचारांची सतत आठवण करून देणार आहे. तसेच युवकांना समाज आणि राज्याच्या विकासासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारे हे स्मारक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा जतन करणे आणि समाजकल्याणाचे कार्य पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *